Saturday, May 13, 2023

शुभेच्छांचे पांघरूण (title credit: Vivek Dharankar)


फार दिवसांनी मी बनवलेल्या गोधडीबद्दल लिहितेय. हे खरं तर एक overdue लिखाण आहे. गोधड्या बनवण्याबरोबरच त्याबद्दल लिखाण करणे ही माझी मानसिक गरज आहे हे माझ्या लक्षात आलंय. पण दोन्हीही तितक्याच वेळखाऊ गोष्टी आहेत. त्यामुळे एक काम करायला गेले की दुसरं मागे पडतं. असो. आज ज्या गोधडीची कथा आहे त्या गोधडीच्या संकल्पनेचा जन्म आहे ऑक्टोबर २०२१ मधला

 

आपण खूप उत्साहात कार्यक्रम आयोजित करतो, बोलावलेले पाहुणेपण आवडीने येतात, शुभेच्छा, आशीर्वाद देतात. कार्यक्रम संपला की नंतर आपण त्या आठवणींत रमतो, फोटो काढून बघतो. आवर्जून आपल्या कार्यक्रमाला येणाऱ्या व्यक्तींच्या शुभेच्छाही आपण आपल्या मनात साठवून ठेवतो. पण याच भावना जर पाहुण्यांना लिहून / चित्र काढून  व्यक्त करता आल्या आणि आपल्यालाही त्या 'बघता' आल्या, त्यांना "स्पर्श करता" आला, “पांघरूनघेता आल्या तर! याच संकल्पनेतून एक विचार पुढे आला.

निमित्त होतं माझ्या मावसबहीणीच्या डोहाळेजेवणाचं. मावशीकडे ही कल्पना मांडली. अंतिम product कसं दिसेल याचं (स्वनिर्मित) उदाहरण नसतानाही तिने आणि मावसबहीणीने माझ्या मनाप्रमाणे आणि कल्पनेप्रमाणे करण्याची तात्काळ मुभा दिली. मग सुरु झाली तयारी. पाहुण्यांची साधारण संख्या विचारात घेतली. पहिलीच वेळ असल्याने माझ्याकडून आणि लिहिणाऱयांकडूनही जास्तच चुका होणार याची तयारी ठेवली. तयार होणाऱ्या गोधडीचा आकार दुपट्याइतका बनवता मोठ्या माणसाला वापरता येईल इतक्या आकाराची बनवावी यावर मावसबहीणीचं आणि माझं एकमत झालं. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन गोधडीला लागणाऱ्या कापडाचे नियोजन करण्यात आले. फिकट रंगांतील मऊ कापडं आणणे, त्यावर fabric pens ने लिहून ते धुवून बघणे, . यात सगळ्यात मेहनतीचे काम होतं ते म्हणजे कापडाचे तुकडे लिखाणासाठी तयार करून घेणे. गोधडी शिवायची तर मऊ कापड पाहिजे आणि मऊ कापडावर लिखाण हे कागदावर लिहिण्याइतकं सोपं नाही. आणि ज्या व्यक्तींना अशा प्रकारे लिहायची सवय नाही त्यांच्यासाठी तर नाहीच नाही. त्यात परत कार्यक्रमासारख्या गडबडीच्या ठिकाणी लिहायचं ... त्यामुळे तर आणखीनच आव्हाने असतात. यासाठी ते कापडाचे तुकडे हाताळण्यासाठी कागदासारखे (तात्पुरते) कडक करून घ्यावे लागतात. यासाठी quiltersच्या मदतीला धावून येतं ते म्हणजे fusible interface. हे कापडाच्या एका बाजूला चिकटवले की त्या कापडाचा द्वाडपणा जाऊन ते गुणी बाळासारखं सहकार्य करतं.

नंतरचा टप्पा होता कापडाचे तुकडे तयार करून घेणं. कोणत्याही शिवणकामासाठी जे दृष्य स्वरूपात दिसतं त्यापेक्षा जास्त कापडाची आवश्यकता असते. तसंच हे तुकडे शिवून गोधडी शिवायची असेल तर तुकड्यांच्या कडेने थोडी जागा सोडली जायला हवी. प्रत्येक व्यक्तीला शिवणातलं हे ज्ञान असणं अपेक्षित नाही. त्यामुळे ती जागा marking करूनच द्यायला हवी. तसेच हे तुकडे शिवणापूर्वी कार्यक्रमात, नंतर तुकड्यांचे गोधडीतील placement ठरवताना हाताळले जाणार म्हणून या हाताळणीतून निघणारे धागे वगैरे कापून परत व्यवस्थित चौरस कारण्यासाठीपण मुख्य लिखाणाच्या बाजूने 'समास' सोडायला हवा. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन लिहिणाऱ्या व्यक्तींना लिखाण आणि/ किंवा चित्र काढणे .५”च्या चौरस तुकड्याच्या मध्यभागी " च्या चौरसाची सीमारेषा आखून देण्यात आली.

तो काळ अजूनही COVIDचाच होता. त्यामुळे सामूहिक कार्यक्रमांतल्या पाहुण्यांच्या संख्येवर बंधने होती. कमी असले तरी इतक्या पाहुण्यांचं घरात करणं जागेच्या दृष्टीने ससुटसुटीत व्हावं म्हणून मावशीने या कार्यक्रमासाठी hall घेतला होता. तिथे या कापडी तुकड्यांवर शुभेच्छा capture करायला एक काउंटर लावला गेला. तिथे कापडाच्या तुकड्यांचे विविध रंगांमधले पर्याय, fabric pens, कापडाखाली धरायला writing pads, रिकामे व लिहिलेले तुकडे ठेवायला बॉक्सेस असा सगळा जामानिमा होता. कोणत्याही प्रकारच्या काउंटरला उभे राहणे ही माझ्यासाठी कायमच आवडीची बाब राहिलीय. माझ्याबरोबर मदतीला माझी लेक आणि माझी भाचरं उत्साहात होती. या प्रयोगासाठी मी excited होते, पण येणाऱयांचा प्रतिसाद कसा असेल याची धाकधूकपण होती. केवळ काउंटर लावून पुरणार नव्हतं तर 'लिहून शुभेच्छा व्यक्त करा. त्याची नंतर गोधडी बनणार आहे.' असे आवाहनही अधून-मधून केले जात होते. बरं हे सर्व सांगताना ऐकणाऱ्यासाठीही ते नवीन आणि आमच्याकडेही दाखवायला उदाहरण नाही. धुळ्यासारख्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमातल्या पाहुण्यांना "गोधडी" हा शब्द नक्कीच नवीन नव्हता, पण एक तर शुभेच्छा "लिहून"(सुद्धा) व्यक्त करायच्या, (खूप जणांना तोंडी व्यक्त होणं सोपं जातं, पण लिहून व्यक्त होणं हा प्रत्येकाच्या comfort चा भाग असतोच असं नाही. एरव्ही greeting cards वर किंवा gift tag वर लिहिणं वेगळं आणि हे असं लिखाण जे सर्वांसमोर लिहायचं आहे, जे कायमस्वरूपी सांभाळून ठेवलं जाणार आहे, ज्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या आहेत तिच्याव्यतिरिक्त इतरही अनेकजण ते वाचणार आहेत या सर्वच बाबी अनेकांना conscious करणाऱ्या असू शकतात), त्याही कापडावर, त्याची गोधडी बनणार आणि आमच्या नुसत्याच शाब्दिक वर्णनाच्या आधारे त्यांनी कल्पना करायची! एकंदरीत आशय, पद्धती आणि कल्पना या सगळ्याच पातळ्यांवर हे त्यांना काहीसं कठीण जात होतं. 'हे कसं?', 'मी पहिल्यांदाच ऐकतोय / ऐकतेय', 'ही छान वेगळी कल्पना आहे' अशा शाब्दिक आणि अशाब्दिक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत होत्या. येणारे पाहुणे आपल्या आवडीच्या रंगाच्या कापडावर आणि आवडत्या रंगाच्या शाईच्या पेनने लिहीत होते. काही वेळा लिहिताना चुका व्हायच्या. मग (कापडावर) चुकलेल्या भागावर काट / फुली मारतो तशी मारायचे. मग त्यांच्या लक्षात यायचं की गोधडीत जाणाऱ्या कापडाच्या तुकड्यासाठी असं नाही चालणार.  कापडाच्या मागून चिकटवलेले fusible लक्षात न येऊन काही जणांनी त्यावरच लिहिलं. काही वेळा आखून दिलेल्या सीमारेषेचं भान न रहाता पूर्ण टोकापर्यंत लिहायचे. म्हणून परत नवीन तुकड्यावर नीट लिखाण चालायचं. लिहिताना वाया जाणारे तुकडे ठेवायला तिसरा box लगेचच जन्माला घालण्यात आला.  

           

                  

या कॉउंटरवरून शुभेच्छा जमा करताना आलेल्या काही अनुभवांबद्दल सांगायला मला आवडेल.

एक तर हा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम असल्याने महिलावर्ग जास्त प्रमाणात होता. काही नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी पुरुष होते, पण कमी प्रमाणात. 'हा (typical) महिलांचा कार्यक्रम' अशी भावना येणाऱयांच्या मनात होती आणि पुरुषांच्या मनात जरा जास्त असल्याचा मला अनुभव आला. कुतूहलाने ते काउंटरपाशी यायचे, बघायचे, पण लिहिताना थोडी हिचकिचाहट असायची. (जसं ओटी भरायची असेल तर त्यांच्या कुटुंबाच्या वतीने घरातील एक महिला भरेल, तसं) 'आमच्या घराच्या वतीने ही लिहील' असं त्यांच्या घरातल्या सोबत आलेल्या मुख्य महिलेकडे निर्देश करून सांगायचे. 'लिखित शुभेच्छा प्रत्येक व्यक्तीपासून अपेक्षित आहेत / प्रत्येकाला ही संधी आहे' हे आम्हाला आवर्जून सांगावं लागायचं. काही पुरुषांना लिहिताना बघून मग इतर लिहायचे. 'ही महिलांची कामं, ही पुरुषांची' हा विचार किती खोलवर रुतला आहे की शुभेच्छा देतानाही तो विचार आपल्याला सोडत नाही!

दुसरा एक अनुभव ---

लिहिण्यासाठी कापडाचे तुकडे गुलाबी, आकाशी, पिस्ता, पिवळा अशा विविध रंगांमध्ये होते. कोणत्या रंगाचा तुकडा घ्यायचा याची पूर्ण मुभा प्रत्येक व्यक्तीला होती. गरोदर बाईला शुभेच्छा देताना
'तुला मुलगा होऊ दे' अशा प्रकारच्या शुभेच्छा जास्त प्रमाणात दिल्या जाण्याचा अनुभव (माझाही) आहे. मुलगा असेल तर निळा रंग आणि मुलगी असेल तर गुलाबी रंग अशा प्रकारे कपडे, खेळणी वापरायची पाश्चिमात्त्य देशांमध्ये पद्धती आहे. Somehow 'तुला मुलगा होऊ दे' ही शुभेच्छा आणि रंगांच्या वापराचे हे norms इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या मनात असल्याचा अनुभव आला. कापडाच्या तुकड्यांमध्ये आकाशी रंगाच्या तुकडयांना जास्त मागणी होती. 

 

असो. पण एकंदरीत फार मज्जा आली यामध्ये. आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मोठी माणसं शुभेच्छा देताना जरा conservative होती. म्हणजे चित्र काढून किंवा visuals च्या स्वरूपात शुभेच्छा देण्याचं प्रमाण लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांमध्ये फार कमी दिसलं. तसंच मोठ्या माणसांनी लिखाणाचा जर एक रंग निवडला तर त्यातच सगळं लिहिणार. शुभेच्छा देण्यात पाहुण्यांमधली सगळ्यात जास्त सृजनशील ही सर्वात लहान मुलगी होती. लिहून व्यक्त होण्याचं तिचं वयही नव्हतं त्यामुळेही असेल, पण कापडाचा तो तुकडा सर्वात जास्त visuals आणि रंगांचा मुक्तपणे वापर केलेला होता. (त्यामुळे हा तुकडा गोधड़ीच्या मध्यभागी आला.) 

 


अशा प्रकारे कापडावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा घेऊन झाल्या. एकूण तीन भाषांमध्ये ५६ तुकडे जमा झाले. त्यानंतर त्या तुकड्याची गोधडी बनवण्याची प्रक्रिया सुरु साली. हाताळल्यामुळे काही तुकड्यांचे धागे निघाले (ते अपेक्षितच होतं) होतें. त्यामुळे सर्व तुकडे परत एकदा नीट कापून घेतले गेले. तुकड्यांची गोधडीतील जागा ठरवताना एका रंगाचे दोन तुकडे शेजारी येणार नाहीत याची काळजी घेतली गेली. तसंच एका भाषेतील आणि एका कुटुंबातील व्यक्तींनी लिहिलेला मजकुरही बाजूबाजूला येणार नाही याची काळजी घेतली गेली. एका तुकड्यावरचा मजकूर दुसऱ्या तुकड्यातील मजकुरात मिसळला जाऊ नये म्हणून प्रत्येक तुकड्याच्या बाजूने एक बारीक पट्टी शिवण्यात आली (quilting च्या भाषेत त्याला sashing म्हणतात). हे सर्व लहान बाळाच्यासंदर्भातलं असल्यामुळे pastel colours च्या तुकड्यांचा वापर करण्यात आला. सर्व तुकड्यांच्या बाजूने बॉर्डर बनवण्यात आली. अशा प्रकारे गोधडीचा सगळ्यात वरचा थर (=quilt top) तयार झाला. त्याचं जे दृश्य स्वरूप झालं त्यापेक्षा ते सगळं खूप जास्त सुंदर होऊ शकलंच असतं, पण मी याबाबतीत पैलटकरीण असल्यामुळे त्याचं रूप हे केवळ दस्तैवजीकरणासारखे झाले हे मला मान्यच करायला पाहिजे. मावशी आणि मावसबहिणीने ते गोड मानून घेतले हा वेगळा भाग.  

  
 

गोधडीच्या आतमध्ये सुती साड्या वगैरे घातल्या जाऊ शकतात, पण या गोधडीमध्ये batting साठी (= गोधडीचा मधला थर) flannelच्या दोन layersचा वापर केला. त्यामुळे गोधडी मऊ तर झालीच, पण तिला गुबगुबीतपणापण आला. गोधडीची आतील बाजूपण (= तिसरा थर किंवा backing) quilt -topच्या कापडाचाच वापर करून बनवली गेली. Quilt-top आणि backing दोन्हीमध्ये तुकड्यांची जोडणी होती आणि या जोडांमुळे गोधडीच्या मऊपणाला कुठेही बाधा येऊ नये म्हणून सर्व जोड मागील बाजूने fuse करण्यात आले.  

              

 

६०" * ९०" ची गोधडी बनली. गोधडीवर हाताने टाके टाकून शिवायला मला खूप आवडतं. या गोधडीच्याबाबतीत मात्र तसा अवधी हातात उरला नाही. (त्याचे कारण पुन्हा कधीतरी लिहिल्या जाणाऱ्या कथेत येईल का? बघू या.) त्यामुळे साध्या शिलाई मशीनवरच टाके टाकले (machine -quilting). ती सर्व बाजूंनी binding करून बंद केली गेली. गोधड़ी पांघरायची असते, पण तिला भिंतीवर "टांगायची" झाल्यास तेही करता यावे म्हणून तिच्या मागे 'quilt sleeve'ही शिवण्यात आले.


मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे ही एक अगदी basic layout मधली गोधडी असली तरी ती प्रत्यक्षात उतरल्याचा अतिशय आनंद मला झाला. (नाहीतर अपूर्ण कामांची (UFOs - UnFinished Objects) आयुष्यात कमी नाही माझ्या). या गोधडीच्या निमित्ताने अनेक गोष्टी मी पहिल्यांदा केल्या. जसं,

. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांच्या शुभेच्छांचे गोधडीत संकलन

. इतक्या मोठ्या गोधडीला machine-quilting

. भिंतीवर टांगण्यासाठी 'quilt sleeve'ची सोय 

खूप शिकायला मिळालं. कार्यक्रमाच्या आयोजकांनी कोणतीही बंधने न घालता पूर्ण मोकळीक दिली तर काय केलं जाऊ शकतं याचं ही गोधडी म्हणजे एक उदाहरण ठरलं.


6 comments:

  1. Amazing concept! अशाच पुढील संकल्पना दुलईसाठी अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. Wonderful work mam

    ReplyDelete
  3. मस्तच. भावी मुशाफिरीसाठी शुभेच्छा

    ReplyDelete
  4. अरे वाह खूपच सुंदर संकल्पना

    ReplyDelete
  5. खुप सुरेख कल्पना आहे♥️

    ReplyDelete