Tuesday, May 2, 2023

माझी पहिली 'महिला बाईक रॅली'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. जून ०२, २०२३ पासून वर्षभर यानिमित्ताने होणारे कार्यक्रम राबवले जातील. याची सुरुवात म्हणून महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग (#maharashtratourism)  अमेझिंग नमस्ते फाऊंडेशनच्या (#amazingnamastefoundation) एकत्रित प्रयत्नांतून मे रोजी महिला बाईक रॅली (ऑगस्ट क्रांती मैदान ते शिवाजी पार्क) आयोजित करण्यात  आली. 'कोणतेही वाहन वापरून रॅली' हे मी आधी अनुभवलेलं नाही. त्यामुळे मी लगेचच सहभागी व्हायचं ठरवलं. activa चालवत असले तरी ती फक्त अंधेरी ते खारदरम्यानच मर्यादित असते. तीपण खूप नियमितपणे नाही. आता जास्त अंतर, जास्त वेळ, त्यातही नऊवारी, तीपण पहिल्यांदाच स्वतःची स्वतःच नेसायची अशा अनेक नवीन गोष्टी होत्या. त्यामुळे adrenaline rush तर होताच.

जवळजवळ ६०-६५% नऊवारीतल्या आणि इतरही पारंपारीरिक वेशभूषेतील महिलांनी फुलून गेलेले मैदान बघणंच इतकं exciting होतं! अनेक जणींना या रॅलीची माहिती मी forward केली. त्यातल्या फक्त डॉ. अश्विनी करवंदे हिने सहभागाची तयारी दाखवली. इतकंच नाही तर तिने तिच्या लेकीलाही तयार केलं. त्यामुळे त्या गर्दीत कुणीतरी माझ्या परिचयाचं होतं. (आणि त्यानिमिताने SNDT महिला विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ अशी  मुंबईमधली दोन्ही महत्त्वाची विद्यापीठे सहभागी झाली आहेत अशी भावना मला आली.)

रॅलीला हिरवा कंदील दाखवायला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे होते. त्याचप्रमाणे पर्यटन खात्याचे माननीय मंत्री श्री मंगलप्रसाद लोढा हेदेखील उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर विराजमान मूर्ती होती. रॅलीच्या आजूबाजूने दिशा दाखवायला, रॅलीमधील वहाने रस्त्याच्या एका मर्यादित भागात राखायला मजबूत marshals होते. व्यासायिक फोटोग्राफर्सही होते. अनेक ठिकाणी लोकं फोटो घेत होते. काही ठिकाणी तर पोलीसपण फोटो घेत होते. काही ठिकाणी या महिला रायडर्सवर गुलाब-पाकळ्यांचा वर्षाव होत होता. रॅलीमध्ये सहभागाची एक वेगळी मज्जा असते, पण bike रॅलीची आणखीन मज्जा होती. ज्या रस्त्यांवरून पायी / टॅक्सी / कारने गेलोय किंवा काही रस्त्यांवरुन कदाचित गेलोच नाही आहोत अशा रस्त्यांवरुन जायला फार special वाटत होतं. एखाद्या रस्त्यावरून बंदिस्त वहानाने जाण्यापेक्षा bike किंवा सायकलसारख्या उघड्या वाहनाने जाण्याचे excitation मला काही वेगळेच वाटते. तो योग या रॅलीत मोठ्या प्रमाणात आला. रस्त्यात सिग्नलला लाल दिवा असला तरी रॅलीचा भाग म्हणून पार करून जाताना गम्मत वाटत होती. रॅली ऑगस्ट क्रांती मैदानापासून दक्षिणेकडे पार museumपर्यंत जाऊन मग शिवाजी पार्कच्या दिशेने मार्गस्थ झाली. एकूण  किमी अंतर २ तासांत पार करून शिवाजी पार्कला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकापाशी रॅली संपली. 

रॅली संपली तरी माझ्यासाठी आजच्या दिवसाचा परमेश्वराचा आशीर्वाद मात्र संपलेला नव्हता. आयोजकांनी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. आणि त्यात (आमच्या पार्ले टिळकच्या) श्रीम. अनुराधा गोरे बाई (#anuradhagore @anuradhagore4887) प्रमुख पाहुणे म्हणून होत्या. वीरमाता म्हणून त्यांचे कार्य किती अफाट आहे आणि ते किती सर्वदूर पसरलेले आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. शाळेत असताना off periodला आम्हाला गोरे बाईच हव्या असायच्या. आणि त्या आल्या की त्यांनी आम्हाला गोष्ट सांगायची हा हट्ट अगदी दहावीत गेलो तरी असायचा. या कार्यक्रमातही त्यांनी दोन समर्पक गोष्टी सांगितल्या आणि परत एकदा मला शाळेच्या दिवसांत नेलं.

आयोजकांनी या एकूणच कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती. प्रत्येक सहभागी महिलेचे driving license तपासणे, ओळखपत्र वितरीत करणे, मैदानावर पाणी व नाश्त्याची सोय हे तर होतंच. शिवाय रॅलीदरम्यानही पाण्याची सोय होती. रॅली संपल्यावरही थंड सरबत आणि शेवटी पाणी व जेवण या सोईपण होत्या.

माझ्या या पहिल्यावहिल्या bike रॅलीत मला खरंच मज्जा आली.

 

विशेष आभार

 

अशी रॅली आयोजित करून उत्तम नियोजनासह ती पूर्णत्वाला नेल्याबद्दल - अमेझिंग नमस्ते फाऊंडेशन (श्री अतुल कुलकर्णी) #amazingnamastefoundation

या रॅलीची माहिती कळवल्याबद्दल - प्राध्या. (डॉ.) जयश्री शिंदे

रॅलीबाबतीत whats app group करून त्यावर सगळी माहिती दिल्याबद्दल - उमा रायकर

मी नऊवारी नेसावी म्हणून स्वतःहून एक नाही तर दोन नऊवारी साड्या पाठवल्याबद्दल - डॉ. गौरी हर्डीकर

हा पर्याय ऐनवेळेस रद्द झाला, पण शिवलेली नऊवारी दागिन्यांसह सोलापूरहून पाठवायची तयारी केल्याबद्दल माझी मावस-वाहिनी - डॉ. माधुरी अंबळकर तिचा नवरा (माझा मावसभाऊ) डॉ. सागर अंबळकर

नऊवारीवर हातात घालायला खास पिच्छूडी तोडे दिल्याबद्दल - समीधा धुमटकर

नथवाल्या मंगळसूत्रासाठी - आकार creations (शिल्पा लेले उर्फ संगीता साने)

आयुष्यातली पहिली नऊवारी नेसण्याचा सगळा आनंदच या मैत्रिणीमुळे आहे. ३३ वर्षांपूर्वी माझ्यासाठी साडी उपलब्ध करण्यापासून ते प्रत्यक्ष नेसवण्यापर्यंत सगळं तिने केलंय. त्यामुळे त्यानंतर कधीही नऊवारी नेसण्याचा विचार आणि आत्मविश्वास माझ्यासाठी तिच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही - प्रीती पेठे

माझी खूप काळजी असल्याने pillion म्हणून निदान सुरु होण्याच्या pointपर्यंत यावं असं वाटूनही केवळ माझ्या आग्रहाखातर मला एकटीलाच मुक्त सोडून दिल्याबद्दल आणि of course activa पूर्ण maintained अवस्थेत मला सुपूर्त केल्याबद्दल - विवेक धारणकर

नऊवारी साडी स्वतःची स्वतः कशी नेसावी याचा सर्व बारकाव्यांसह youtube विडिओ बनवल्याबद्दल - सपना (https://www.youtube.com/watch?v=yvg47_WYNm8)

साडी नेसताना मदत केल्याबद्दल आणि निघण्यापूर्वीचे photo काढल्याबद्दल - मानसी धारणकर

rally सहभागी झाल्याबद्दल आणि rallyदरम्यान photo video काढल्याबद्दल - डॉ. अश्विनी करवंदे

डॉ. अश्विनीसमवेत फोटो काढल्याबद्दल - कौमुदी करवंदे

 

आणि हा सर्व योग जुळवून आणल्याबद्दल त्या विधात्याचे आभार


या लिखाणाबाबत मला एक गोष्ट अजून सांगायची आहे.

हा अनुभव मला Englishमधूनही लिहिता आला असता. कदाचित आतापेक्षा १/४ वेळातच लिखाण झाले असते. पण मराठीतून व्यक्त होणं हे १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त अधिक समर्पक तर वाटलंच पण आणखीन एक कारण घडलं  ... काही काळापूर्वी आमच्या विद्यापीठातर्फे #SNDTWU  #gunjarav चा #boruteblog हा कार्यक्रम अनुभवायची संधी मिळाली. त्यात एक खूप छान वाक्य होतं "मराठी भाषा ही रेशमी वस्त्र आहे .... आणि या रेशमी वस्त्राला ऊन दाखवायला हवं .....  जेव्हा आपण मराठीतून व्यक्त होतो, त्यावेळेला मराठी भाषेच्या या रेशमी वस्त्राला ऊन लागतं." या लिखाणाच्या निमित्ताने हाच ऊन दाखवायचा प्रयत्न केला आहे. 
























1 comment:

  1. Wow!! Jhansi ki Rani you are looking gorgeous and beautiful. Great going too. Enjoyed the pics and everything of it. Great Woman! Lots of love and blessings. Mami from Pune

    ReplyDelete